Breaking News

संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

संगमनेर, दि. 10 - तालुक्यातील बहुतांशी भागात काल शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार वार्‍यासह हजेरी लावली. जवळपास 1 तासाच्यावर  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली होती.
आश्‍वी, वडगावपान, पानोडी, पठार भागातील काही परिसर, कोल्हेवाडी, समनापूर, कोकणगाव, पोखरी हवेली, कुरण, सुकेवाडी, घुलेवाडी, मंगळापूर, चिखली,  निमज, धांदरफळ, राजापूर, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, कर्‍हे, निमोण आदी पट्ट्यात काल तीन दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक  सुरु झालेल्या या पावसाने व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. भाजी विक्रेत्यांचीही धांदल उडाली होती. जवळपास तासभर झालेल्या या पावसाने रस्त्यावरुन  मोठ्या प्रमाणात  पाणी वाहत होते. ओढे नाले वाहू लागले होते.  वातावरणातही मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाचा  जोर कायम राहिला तर खरीपाच्या पेरण्यांना याचा फायदा होणार आहे. सध्या सुरु असलेले फ्लॉवरच्या लागवडीला हा पाऊस उपयोगी ठरणार आहे. शहर पालिकेने  पावसाळा सुरु होण्यापूर्वीच गटारी व नाल्यांची साफ सफाई केली आहे. पावसाच्या पाण्यामुळे सुकेवाडी रोडची पुर्नवसन कॉलनी, दिल्ली नाका, नाटकी नाला या भागात  मोठ्या प्रमाणावर गटारींचे पाणी तुंबते. त्यामुळे नागरीकांच्या घरांचे व संसारोपयोगी वस्तुचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याची दक्षता घेत पालिकेने नाल्यांचे काम  हाती घेवून पावसा अगोदरच पूर्ण केले आहे.