जपानचा निशिकोरी विम्बल्डनला मुकण्याची शक्यता
हॅले, दि. 23 - जागतिक क्रमवारीत ‘टॉप 10’ मध्ये असलेला जपानचा टेनिसपटू केई निशिकोरी (9) हा दुखापतीमुळे विम्बल्डन स्पर्धेला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या ‘हॅले खुल्या टेनिस स्पर्धे’त आज निशिकोरीच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. ‘अंतिम 16’च्या फेरीत निशिकोरीचा सामना रशियाच्या कारेन खात्चानोव्हशी सुरू होता. मात्र, सामना सुरू झाल्यावर लगेचच 3-2 अशी गुणसंख्या असताना निशिकोरीने सामन्यातून माघार घेतली. आता वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच निशिकोरीला दुखापतीबाबत अंदाज घेता येऊ शकतो. दरम्यान, विम्बल्डन स्पर्धा 3 जुलैला सुरू होणार असून तोपर्यंत पूर्णपणे तंदुरूस्त होण्याचे आव्हान निशिकोरीपुढे असणार आहे.