न्यूझीलंडच्या ल्यूक रॉन्कीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
ऑकलंड, दि. 23 - न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ल्यूक रॉन्की याने गुरूवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय रॉन्कीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले होते. ऑस्ट्रेलियातर्फे रॉन्कीने 2008मध्ये पदार्पण केले आणि 4 एकदिवसीय व 3 टी20 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघातून त्याला जास्त संधी न मिळाल्याने तो 2013मध्ये न्यूझीलंडच्या संघात दाखल झाला. न्यूझीलंडतर्फे त्याने 4 कसोटी, 85 एकदिवसीय आणि 32 टी20 सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी रॉन्की देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.