पर्यावरणाचा प्रश्न युवकांनी हाताळल्यास बदल निश्चित - सामलेटी
शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करत असताना, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा रुजविण्यासाठी गुलमोहर रोड येथील विद्यासागर क्लासच्या वतीने 11 वी व 12 वी विज्ञान शाखेच्या बॅचचा प्रारंभ विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी सामलेटी बोलत होते. याप्रसंगी नाट्य दिग्दर्शक शशीकांत नजान, मुंबई शाखेचे मार्केटिंग हेड विनायक दारकुंडे, विशाल फलटणकर आदिंसह शिक्षक, विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात संचालिका गौरी सामलेटी म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने विद्यासागर क्लासचे विद्यार्थी शहरात विविध ठिकाणी वृक्षरोपणाचे कार्यक्रम घेणार असून, एक हजार वृक्षरोपणाचा संकल्प पुर्ण करणार आहे. पालकत्व पध्दतीने लावलेले वृक्ष संवर्धनासाठी दत्तक दिले जाणार आहे. तसेच नागरिकांनी वृक्षरोपण व संवर्धनाची तयारी दर्शविल्यास त्यांना मोफत रोप उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विनायक दारकुंडे म्हणाले की, सामाजिक भान ठेवून विद्यासागर क्लासने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलले आहे. युवकांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती होण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पुस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक प्रश्नांची जाणीव विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली आहे. क्लासच्या वतीने 1 हजार वृक्षरोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला असून, पहिल्या दिवशी वृक्षरोपणाबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शशीकांत नजान यांनी पर्यावरणाचा प्रश्न युवकांना समजल्यास परिवर्तन घडणार आहे. शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. बॅचच्या पहिल्या दिवसापासून पर्यावरण संवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना देवून एक प्रेरणादायी पायंडा विद्यासागर क्लासच्या वतीने निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.