Breaking News

वाढीव कर आकारणीसाठी मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण!

बुलडाणा, दि. 01 - शहरातील मालमत्तांना नव्याने तसेच वाढीव कर आकारणीसाठी पुन्हा सर्वेक्षणास लवकरच प्रारंभ होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पालिकेतील कर विभागाच्या प्रत्येकी 4-5 कर्मचार्‍यांचा समावेश असलेले पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. नव्याने कर आकारणीसाठी शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी कर विभागातील कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात येणार असले, तरी सर्वेक्षणात पारदर्शकता येण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाच्याधर्तीवर पालिकेतील इतर विभागातील कर्मचार्‍यांचाही या पथकात समावेश केल्या जाणार असल्याची माहिती आहे.
खामगाव शहरात सुमारे 29 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांमध्ये सुमारे चार हजार खुले भूखंड असून, चार हजारांच्यावर जुन्या मालमत्तांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित 21 हजार मालमत्तांपैकी नवीन दोन हजार मालमत्तांच्या नव्याने कर आकारणीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून, शहरातील सुमारे 19 हजारांवर मालमत्तांना   अद्यापही जुन्याच पद्धतीने कर आकारणी केल्या जात आहे. दरम्यान, आता या मालमत्तांना नव्याने, वाढीव कर आकारणीसाठी फेर सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, नवीन कर आकारणीबाबतीत पालिका कर्मचार्‍यांना वरिष्ठ स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात या सर्वेक्षणास सुरुवात झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण शहरातील मालमत्तांच्या फेर सर्वेक्षणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. खामगाव नगरपालिकेने यावर्षी प्रथमच अपेक्षित उद्दिष्टपूर्ती गाठली असून, आता फेर सर्वेक्षणाद्वारे नव्याने तसेच वाढीव दराने कर आकारणी करून पालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालका प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहे. त्यानुषंगाने कर विभागाला कामाला लागण्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. यासंदर्भात कर विभागातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांची बैठक मुख्याधिकार्‍यांच्यादालनात नुकतीच पार पडली. यावेळी कामात कुचराई न करण्याचे निर्देशही मुख्याधिकार्‍यांनी कर विभागातील कर्मचार्‍यांना दिले.