Breaking News

अनुसुचित जातीच्या युवकाच्या खुन प्रकरणी सहा जणांना जामीन मंजुर

नांदेड, दि. 30 - सन 2012 मध्ये नवी आबादी शिवाजीनगर येथे जमा्ला करून अनुसूचित जातीच्या युवकाचा खून केला होता आणि इतर तीन जण जखमी झाले  होते. त्या प्रकरणात नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने 7 जणांना 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या सात जणांची  शिक्षेविरूद्धची अपील दाखल करून घेतली असून 6 जणांना जामिन मंजुर केला आहे. हे आदेश उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही.एल. आचलीया  यांनी दिले आहेत.
दि. 21 जुलै 2012 रोजी त्यावर्षांचा रमजान महिन्याचा पहिला दिवस होता. नवी आबादी परिसरात सायंकाळी 4 वाजता देवानंद हनुमंते, राष्ट्रपाल हनुमंते, हेमंत  हनुमंते, शुक्लोधन सुर्य हे लोक नई आबादी परिसरात हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. त्यात छोट्याशा क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण मोठे झाले आणि जमावाने  हनुमंते बंधूवर हल्ला केला. त्यात देवानंद हनुमंते यांचा मृत्यू झाला आणि राष्ट्रपाल हनुमंते, हेमंत हनुमंते आणि शुक्लोधन सुर्य हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी  एकूण 23 जणांविरूद्ध खून करणेसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. नांदेड जिल्हा न्यायालयात  चाललेल्या या खटल्यात उपलब्ध पुराव्याआधारे पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी 7 जणांना 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. हा निकाल 26  एप्रिल 2017 रोजी आला होता. इतर 16 आरोपींची मुक्तता झाली होती.