Breaking News

मुस्लिम धर्मगुरूंकडून पंकजा मुंडे यांच्या कामाची प्रशंसा

बीड, दि. 30 - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणे पालकमंत्री पंकजा मुंडे या देखील जिल्हयाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, त्यांच्यामुळेच  आज रेल्वे सारखा प्रश्‍न सुटला व विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हयाला भरीव निधी मिळाला अशा शब्दांत जिल्हयातील मुस्लिम धर्मगुरूंनी मुंडे यांच्या कामाची  प्रशंसा केली. निमित्त होते शहरात विविध ठिकाणी साजरा झालेल्या ईद मिलाप कार्यक्रमाचे. मुंडे यांचे बुधवारी शहरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. संध्याकाळी पेठ  बीड भागात भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम जहांगीर यांच्या निवासस्थानी ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास  आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाषचंद्र सारडा, राजाभाऊ मुंडे, समाजकल्याण  सभापती संतोष हंगे, सर्जेराव तांदळे, सतीश शिंदे तसेच जमेतुल उलमा हिंदचे प्रदेश उपाध्यक्ष मौलाना जाकीर साब, मौलाना बाकी साब, सफदर साब, सलीम साब,  इब्राहिम साब, सादेक साब आदीसह जिल्हयातील मुस्लिम धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंडे यांचा सलीम जहांगीर व सर्व धर्मगुरूंनी सत्कार केला. यावेळी बोलताना मौलाना जाकीर साब यांनी मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे  मुस्लिम समाजाच्या प्रश्‍नांविषयी नेहमी आग्रही असायचे, आज ते हयात नसले तरी त्यांची उणीव पंकजा कधी भासू देत नाहीत. जिल्हयाच्या विकासासाठी त्यांनी भरीव  निधी आणला असून त्यांच्या कामाचा झपाटा मुंडे साहेबांसारखा असल्याचे ते म्हणाले. शहरातील समाजाची गरज लक्षात घेऊन तकीया कब्रस्तानची जागा वाढवून  देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.  याप्रसंगी बोलताना मुंडे यांनी कब्रस्तानच्या जागा विस्ताराचा प्रश्‍न तातडीने सोडवू असे आश्‍वासन दिले. मुस्लिम समाज नेहमीच  आमच्या पाठिशी राहिला आहे. सत्तेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍नांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगून त्यांनी ईद निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.