Breaking News

धरणांच्या पाणलोटात संततधार सुरु पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

अकोले, दि. 30 - मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे 24 तासात साडेसहा इंच तर घाटघरला 4 इंच पाऊस पडला. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव भरुन ओसांडून वाहू लागला असून मुळा नदी वाहती झाली आहे. तालुक्याच्या पुर्व भागात मात्र पाऊस नाही.
दोन दिवसांपासून कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड पट्टयात मान्सून पुन्हा सक्रीय झाला. कालपासून सह्याद्रीच्या डोंगररांगात पावसाच्या जोरदार सरींची बरसात सुरु आहे. आज सकाळपर्यंत 24 तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - भंडारदरा 34, रतनवाडी 164, घाटघर 102, पांजरे 71, वाकी 35. आज दिवसभरही भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच होता. दिवसभरात भंडारदर्‍यात 30 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात पडत असणार्‍या पावसामुळे या परिसरातील ओढे नाले आता जोमाने वाहू लागले आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठयातही चांगली वाढ होत आहे. सकाळपर्यंतच्या 24 तासात भंडारदरा धरणात 330 दलघफू पाण्याची आवक झाली. तर दिवसभरात त्यात अजून 93 दलघफूटांची भर पडली. सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 2 हजार 427 दलघफू झाला होता. धरणातून सध्या 1 हजार 204 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तर निळवंडे धरणातून 1 हजार 200 क्यूसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्‍चंद्र परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलाव रात्री भरुन ओसंडून वाहू लागला. 600 दलघफू क्षमतेच्या या तलावात 500 दलघफू पाणीसाठा करण्यात आला आहे. पिंपळगाव खांड तलाव भरल्यामुळे मुळा नदी वाहती झाली असून मुळेचे पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे. आज पिंपळगाव खांड धरणाच्या भिंतीवरुन 2 हजार क्यूसेक विसर्ग सुरु होता. अंबित पाठोपाट भरलेला पिंपळगाव खांड हा  तालुक्यातील दुसरा तलाव होय.