Breaking News

रोहयो’तून 8 हजार 500 मजुरांना मिळाला रोजगार

पुणे, दि. 21 - प्रत्येक गावात विकासाचे प्रश्‍न एकसारखेच असतात. काही गावे लोकसहभागातून विकासाच्या दिशेने वाटचाल करतात तर काही गावे नागरिकांच्या व  शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहतात. यासाठी राज्य सरकारने अशा गावांच्या विकासकामांचा आराखडा तयार करून ‘रोहयो’च्या माध्यमातून  समृद्ध ग्राम निर्मितीकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील 40 गावांचा कायापालट होण्यास मदत झाली आहे. याच ‘रोहयो’च्या माध्यमातून या गावातील  8500 मजुरांना रोजगार मिळाला असल्याची माहिती बारामती पंचायत समिती प्रशासनाने दिली.
गावात दरवर्षी उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोत आटत चालले आहेत. पाण्याअभावी शेतीची कामेही कमी होत आहेत. त्यामुळे ‘रोहयो’ अंतर्गत पंचायत समिती मार्फत  सिंचन विहिरी (43), घरकुल (1253), गोठा (44), कुक्कुटपालन शेड (20) शेळीपालन शेड (25), जलसंधारणाची कामे (07) वृक्ष लागवड (09), आदींच्या  माध्यमातून रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली. ही कामे करण्याकरिता स्थानिक नागरिकांना संधी देण्यात आली. या योजनेमुळे आर्थिक दुर्बल घटकांतील  सदस्यांना शंभर दिवसांचा रोजगार मिळाला; तसेच अकुशल कामगारांनाही आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे  यांनी स्पष्ट केले आहे.
कामावरील खर्च - 2 कोटी 71 लाख
रोहयो’साठी सन 2016-1 तहसील कार्यालयांतर्गत 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत 38 लाख 23 हजार रुपये एवढा खर्च झाला. तर पंचायत समितीने केलेल्या कामावर  2 कोटी 32 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सन 2017-18 मध्ये फक्त पंचायत समितीमार्फत करण्यात आलेल्या कामावर 54 लाख 78 हजार रुपये खर्च  झाले असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.
11 कलमी कार्यक्रमांनुसार कामे -
शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे, तसेच मजुरांना शाश्‍वत रोजगाराची हमी मिळावी. यामुळे ही सर्व कामे करताना अकुशल आणि कुशल बाबींचाही यात  प्रामुख्याने समावेश करण्यात आला. तसेच, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत 11 कलमी कार्यक्रमानुसार सर्व कामे केल्याचे पाहायला मिळाले.