Breaking News

मुख्याध्यापक रविंद्रसिंह राजपूत यांच्यावर गोळीबार

बुलडाणा, दि. 30 - स्वत:च्या घरासमोर मोबाइलवर बोलत असताना मुख्याध्यापकावर अज्ञात इसमांनी गोळी झाडल्याची घटना तालुक्यातील घार्णी रस्त्यावरील महाराणा प्रताप नगरात दि.28 जूनच्या रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यात जखमी गंभीर जखमी झालेल्या मुख्यापकास येथील कोलते हॉस्पीटलरमध्ये भरती करण्यात आले. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गोळी बाहेर काढण्यात आली असुन रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील निवाणा येथील भिकमसिंह पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक रविंद्रसिंह गुलाबसिंह राजपूत (वय-46) हे घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रताप नगरातल्या त्यांच्या राहत्या घरी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास मोबाइलवर बोलत होते.अचानक मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने  पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली. पाठीमागून उजव्या बाजूने झाडलेली गोळी समोरील पोटाच्या डाव्या बाजूने आतड्यात फसली. दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रविंद्र सिंह राजपूत खाली कोसळले. गंभीररित्या जखमी झाल्यानंतरही त्यांनी त्यांच्या घराशेजारील मित्र छोटू व संदेश चोरडीया यांना फोन लावला व त्यांच्या मदतीने रात्री 11 वाजेच्या सुमारास कोलते हॉस्पीटल गाठले. शल्यचिकित्सक डॉ.अरविंद कोलते व डॉ.गौरव कोलते यांनी तात्काळ रुग्णा ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले व उपचार सुरु केले. तब्बल अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रविंद्र सिंह राजपूत यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेतील अज्ञात हल्लेखोर कोण असावेत व त्यांनी कोणत्या कारणावरुन गोळी झाडली यासंदर्भात उलगडा अद्याप झालेला नाही. शहर पोलिसांनी जखमीच्या पत्नी सौ.सपना रविंद्रसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरुद्ध अपराध नं. 306/17 कलम 307, 34 भादंवि आर्म अ‍ॅक्ट 3,25 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक व्ही.एन.ठाकरे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.