लांजा, संगमेश्वर तालुक्यांना पूर्वमोसमी पावसाने झोडपले
रत्नागिरी, दि. 01 - रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा आणि संगमेश्वर तालुक्यांना पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 67.11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लांजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 203 मिलिमीटर, तरत्याखालोखाल संगमेश्वरमध्ये 104 मिलिमीटर, तर दापोलीत सर्वांत कमी म्हणजे 3.71 मिमि पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाला आहे. काल दिवसभर आणि रात्री जिल्ह्यात दापोली आणि गुहागर तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. आज दिवसभरही जोरदार पाऊस सर्वत्र पडत आहे. रत्नागिरी शहराच्या बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापार्यांची दाणादाण उडाली. रत्नागिरीजवळच्या कुवारबाव येथे महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात महामार्गावर रस्त्यावरून घसरल्याने विविध ठिकाणी सहा वाहनांचा अपघात झाला. सायंकाळी चार वाजल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.