Breaking News

जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाल्याने नियंत्रण कक्ष सुरू


औरंदाबाद,दि. 11 : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयात (कडा) नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जायकवाडी धरणात सात दिवसांत 16.23 दलघमी पाण्याची आवक झाली असून 18.99 टक्के पाणीसाठा आहे. वरच्या धरणातील पाणी पातळी व पर्जन्यमानाची 
नियंत्रण कक्षात नोंद करण्यात येत आहे. औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू  झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कडा’ कार्यालयात एक जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. पर्जन्यमान, पाण्याची आवक यांची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या वरील भागातील करंजवण, ओझरखेड, पालखेड, गंगापूर, कश्यपी, दारणा, मुकणे, भंडारदरा, निळवंडे, मुळा, पुणेगाव यांच्यासह 22 प्रकल्पातील पाण्याची नोंद ठेवण्यात येत आहे.जायकवाडी धरणात आतापर्यंत 16.27 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पात 18.99 टक्के पाणीसाठा आहे. धरणात आजपर्यंत 3.253 द.ल.घ.मी. पाण्याची आवक झाली. येलदरी प्रकल्पात 12.75 आणि विष्णुपुरी प्रकल्पात 0.57 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. पर्जन्यमानाची नोंद घेऊन पूरग्रस्त गावांना दक्षतेचा इशारा देण्याचे काम नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. यावर्षी दमदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बहुतेक प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन नियंत्रण कक्ष उपाययोजना करण्यासाठी समन्वयकाचे काम करणार आहे.