शिवणी जाट येथे अतिसाराची लागण
नाल्या अभावी गावातील सांडपाणी रस्त्यावर; दुषित पाणी पुरवठामुळे 40 ते 50 रुग्णांना झाली अतिसाराची लागण
बुलडाणा, दि. 05 - नाल्या अभावी गावातील सांडपाणी रस्तावर वाहुन तसेच गटारात सालेल्या घाणीमुळे आणि ग्रामपंचायतच्या दुषीत पाणी पुरवठ्यामुळे तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या शिवणी जाट येथे अतिसाराची लागण झालेली आहे. 150 कुंटुब लोकसख्या असलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य अतिसाराचा रुग्ण झााला असून यामुळे गावात भितीचे वातारवण निर्माण झाले. मात्र, आरोग्य विभागाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील शिवणी जाट व सोनुना गट ग्रामपंचायत असलेल्या शिवणी जाट गावात 150 कुंटुब संख्या असून 620 लोकसंख्या आहे. या गावात विकासाच्या नावावर प्रत्येक गल्लीमध्ये सिंमेट कॉक्रीटचे रस्ते बनविण्यात आलेले आहेत. मात्र, रस्त्याच्या कडेला कुठेही गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या दिसून येत नाही. यामुळे गावातील सांडपाणी बाराही महिने रस्त्यावरूनच वाहते. गावातील रिकाम्या जागेवर सांडपाणी साचून गटारे निर्माण झाले आहे. या गटारांमध्ये मोठया प्रमाणावर वरहाचा मुक्त संचार दिसुन येतो. घाणीचे साम्राज्य गावातील लोकवस्तीत पसरलेले आहे. गावामध्ये स्वच्छता अभियानाच्या नावाखाली बांधण्यात आलेल्या शौचालयांना अनेक ठिकाणी शोषखड्डेच नसल्यमुळे त्या शौचालयांचे घाण पाणी गावातील रस्त्यामध्ये वाहते. गावात सर्वत्र अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरुन रोगराईची लागण झालेली आहे. गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणारी ग्रामपंचायतची यंत्रणाही गेल्या 40 ते 50 वर्षापुर्वीची असून पाणीसाठवण करण्यात आलेली दगडी टाकीचे साफसफाई होत नसल्यामुळे गावाला दुषीत पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थानी सांगितले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी विहीरीतून तसेच बोरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी गावातील काही ग्रामस्थ वापर करतात मात्र काही ग्रामस्थाना नाईलाजास्तव ग्रामपंचायत पुरवठा करीत असलेल्या दुषीत पाण्याचाच पिण्यासाठी उपयोग करावा लागतो. गावातील अस्वच्छता आणि गावाला होत असलेला दुषीत पाणी पुरवठा याकडे मात्र ग्रामसेवक पि.ए. करवते तसेच सरंपच सुषमा घनशाम इंगाले जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. गावात अतिसाराची लागण होउन दोन दिवस झाले तरीही आरोग्य यंत्रणा व गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांना मात्र याचे काहीही सुतवाच नसल्यामुळे रुग्णांना खाजगी वैद्यकीय सेवा घ्याव्या लागत आहे. घरातील प्रत्येक सदस्यच अतिसराला बळी पडत असल्यामुळे खाजगी वैद्यकीय सेवा पुरविणार्या डॉक्टरांचा धंदाही तेजीत आला आहे. योग्य उपचाराअभावी गावातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या वल्गना करणार्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांना आरोग्य विभागाविषयी विचारणा केली असता शिवणी जाट येथे आरोग्य सेवक आहे किंवा नाही या विषयी त्या सम्रभ्रात असल्याचे दिसुन आल्या. यामुळे स्वच्छ भारत अभियान हे केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे उघड झाले असून नियमांवर बोट ठेउन बोलणार्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांना त्यांच्याच आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांविषयी व कामाविषयी पुर्णपणे माहिती नसल्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा अधिकार्यांच्या निष्कीयतेमुळे सरंपच व ग्रामसेवक गावकर्यांच्या जीवनाशी खेळ खेळताना दिसून येत आहेत. शिवणी जाट येथे तब्बल 40 ते 50 पेक्षा जास्त रुग्णांना अतिसाराची लागण झालेली आहे. यामध्ये निळकंठ गवळी, प्रियका गवळी, चंद्रकात बरले, केशव बरले, राजश्री बरले, पंचफुला बरले, प्रविण बरले, सारीका बरले, आशा बरले, सविता बरले, केशराबाई बरले, मिरा बरले, प्रविण बरले, दिपाली धांगड, शरद खरात, शरद जिरवणकर, त्रिवेणी हराळ, प्रदिप खरात, भाग्यश्री हराळ, रामराव हराळ, प्रविण गांजरे, संतोष गांजरे, शांताबाई सरकटे व शिवाजी जिरवणकर यांचे संपूर्ण कुटुंबासह अनेक जणांना अतिसाराची लागण झाल्यामुळे योग्य उपचारांची गरज आहे.