Breaking News

मार्क्सवर भर न देता स्टेट मेरीट लिस्ट नंबरवर भर द्यावा - प्रा.हेमचंद्र शिंदे

अहमदनगर, दि. 05 - कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याकरीता सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करुन विद्यार्थ्यांनी राज्य पातळी व देशपातळीवरील स्पर्धांना सामोरे जावे. कमी विद्यार्थी संख्या व तज्ञ मार्गदर्शनाखाली हे होऊ शकते. विद्यार्थ्यांनी मार्क्सवर भर न देता स्टेट मेरीट लिस्ट नंबरवर भर द्यावा. सरासरी मार्कांपेक्षा परसेंटाईल पद्धती चांगली असते. पारंपारिक मेडिकल व इंजिनिअरिंगच्या पर्यायाबरोबरच विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत.उदा. केव्हीपीवाय, आयएसएसईआर, एनएटीए इत्यादी तसेच एआयआयएमएस, एएफएमसी, अ‍ॅग्रीकल्चर या क्षेत्रातही विविध संधी आहेत, असे प्रतिपादन पुणे येथील तज्ञ करीअर मार्गदर्शन हेमचंद्र शिंदे यांनी केले. 
गुलमोहोर रोडवरील एक्सपर्टस् सायन्स अ‍ॅकेडमीच्यावतीने ‘10 वी व 12 वी नंतरचे शिक्षण क्षेत्रातील विविध पर्याय’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी श्री.शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना श्री.शिंदे म्हणाले, पालकांनी मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण टाकू नये. त्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. याचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने त्याच्याकडे लक्ष द्यावे. आवडत्या क्षेत्रात मुलं चांगली प्रगती करु शकतात. एखाद्या विषयात त्याची आवड असली परंतु काही कारणास्तव ते शक्य नसल्यास त्यास समजावून सांगावे किंवा तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल.
यावेळी श्री. शिंदे यांनी इंजिनिअरिंग व मेडिकलच्या प्रवेश प्रकियेतील तांत्रिक बारकावे याबाबत उपायुक्त माहिती देऊन उपस्थित पालक विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.  याप्रसंगी प्रा.प्रशांत दरे म्हणाले, 10वी व 12 वी नंतर काय याबाबत अनेक पालक-विद्यार्थी अनाभिन्न असतात, योग्यवेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले की, त्यादृष्टीने मुलांचा शैक्षणिक प्रवास सुरळीत होऊन त्यात तो प्रगती करु शकतो. आपले चांगले भविष्य घडू शकतो; यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यक असते.  या उपक्रमासाठी प्रा.राम दिवाणे, प्रा.कन्हैय्या चौधरी, प्रा.सौ.तारका धामणे, प्रा.सौ.सुचेता लांडे यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुचेता लांडे यांनी केले तर प्रा. राम दिवाणे यांनी आभार मानले.