लिंगदेवमध्ये शेतकर्यांनी ओतले रस्त्यावर दूधाचे टँकर
शेतकरी आक्रमक; आठवडे बाजारही बंद
अकोले, दि. 05 - शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यभर 1 जून पासून विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत, या संपाचे लोण आता ग्रामीण भागातही पोहचले आहे. अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील शेतकरी, शेतकर्यांचे कुटुंब तसेच तरुण सुशिक्षित वर्ग या संपात सक्रीय सहभागी आहेत.संपुर्ण राज्यात 1 जून पासून गावातील सर्व शेतकर्यांनी स्वतःहून शेतातील भाजीपाला, शेतमाल, तसेच दुध संकलन बंद केलेले आहे. तसेच गावातील बाहेर गावी, शहरात जाणारा शेतमाल व दुध रोखून धरला आहे. मात्र या गोष्टीना न जुमाणणार्या प्रभात दुध संघाचे व राजहंस दुधसंघाचे दुधाने भरलेले टँकर जात असताना ते रोखून त्यातील दुध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.
गावातील बळीराजा आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संपावर ठाम असल्याचे गावकर्यांनी सांगितले. याचाच भाग म्हणून रविवारी असणारा गावाचा आठवडे बाजार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला. उद्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून गावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
कर्जबाजारी शेतकर्याला कर्जासह शेतमालाच्या हमीभावाचीच चिंता आहे. तरी सरकारने शेतकर्यांच्या मागण्यांचा विचार करून फक्त आश्वासने न देता मान्य कराव्यात व शेतकरी राजा अशी शेतकर्याला उपाधी न देता त्याच्या मागण्या या सरकारने मान्य करून त्याला खरोखच सरकारने राजा बनवावे अशी बळीराजाची मागणी होत आहे.