Breaking News

दंडकारण्य अभियानातून यंदा जास्तीत जास्त झाडांचे रोपण- आ. थोरात

संगमनेर, दि. 05 - कमी पाऊस, वाढलेला दुष्काळ हे मानवांसह सजीव सृष्टीसाठी मोठा धोका असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहे. यावर्षी वृक्षरोपनाकरीता गावोगावी मोकळया जागेवर व रस्त्यांच्या दुतर्फा खड्डे तयार करुन जास्तीत जास्त झाडांच्या रोपन करावे असे आवाहन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे दंडकारण्य अभियान समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, शंकर खेमनर, भाऊसाहेब कुटे, अमित पंडीत, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, साहेबराव गडाख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रांतधिकरी भागवत डोईफोडे, केशव मुर्तडक, अशोक खेमनर, मोहन करंजकर, संपत गोडगे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय वन अधिकारी मच्छिंद्र गायकर, आखाडे, समन्वयक बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते.
आ.थोरात म्हणाले, वृक्षारोपन व संवर्धन हे मानवाची व सजिव सृष्टीची मोठी गरज आहे. तालुक्यात व जिल्ह्यात पर्यावरण जाणीव जागृती वाढली असून दंडकारण्यातून उभे होत असलेले काम समाधानकारक आहे. या चळवळीत लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यावर्षी गावोगावी मोकळ्या जागेत विविध झाडांचे रोपन करण्यास प्राधान्य राहिल. राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा वृक्षारोपन करण्यात येणार आहे. यामध्ये कडुलिंब, निलगीरी, सिताफळ, वड, ग्लेरेसिडीया, सिसू, काशिद यांसह परिसराला अनुकुल वृक्षांचा समावेश राहिल. प्रत्येक ग्रामपंचायतीने कमीत कमी 100 वृक्षांचे रोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी. यावर्षी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाडाचे रोपन व संवर्धन करुन या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांनी आपल्याला दिलेल्या गावातील जागेत वृक्षारोपन करावे. यामध्ये साखर कारखाना ज्ञानमाता हायस्कूल ते समनापूर, राजहंस दुध संघ समनापूर ते वडगाव पान, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था वडगाव पान ते कोकणगाव तसेच इतर सहकारी संस्था ही महामार्गांच्या दुतर्फा वृक्षारोपन करणार आहेत. यावर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेत विविध गावांमधील वृक्षप्रेमी नागरिकांनी या कामात उत्स्फुर्तपणे पुढाकार घेत दंडकारण्य अभियानाच्या मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा  असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
आ. डॉ. तांबे म्हणाले, यावर्षी या अभियानात विविध शासकीय विभागानी ही सामाजिक बांधीलकीतून सहभाग घेतला आहे. यामध्ये महसूल विभागाने खरशिंदे, कृषी विभागाने पारेगाव खु, लोहारे मिरपूर, वन विभागाने कोठे, जलसंपदा विभागाने गुंजाळवाडी, पंचायत समितीने गोडसेवाडी ही गावे वृक्षरोपन व संवर्धनासाठी दत्तक घेवून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीसाठी देशपातळीवर गौरव मिळविला असून यावर्षी ही गावांमधून जास्तीत जास्त वृक्षरोपन करावे.असे ही ते म्हणाले.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, वटसावित्रा पोर्णिमा निमित्त यावर्षी 2111 वटवृक्षांचे गावोगावी रोपन करण्यात येणार असून संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिला व नागरीकांना देण्यात आली आहे. प्रास्ताविक बाळासाहेब उंबरकर यांनी केले तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, अधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.