Breaking News

राष्ट्रपती पदाची निवडणूक ही विचारधारा व तत्वांची लढाई - सोनिया गांधी

नवी दिल्ली, दि. 29 - राष्ट्रपती पदाची निवडणूक ही विचारधारा व तत्वांची लढाई असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती पदाची  निवडणूक ही आमच्यासाठी विचारधारा व तत्वांची लढाई असून त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे सोनिया म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रपती पदाच्या  उमेदवार असलेल्या मीरा कुमार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सोनिया यांनी हे मत व्यक्त केले. मीरा कुमार यांच्याबरोबर सोनिया  यांच्यासह विरोधी पक्षांतील 17 नेत्यांनी त्यावेळी हजेरी लावली होती.
मीरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून मीरा कुमार यांना शुभेच्छा देत प्रशंसा केली. देशाला बांधून ठेवण्यासाठीचे  आवश्यक गुण मीरा कुमार यांच्यात आहेत. विभाजनकारी विचारधारेविरूद्ध त्या त्यांच्यातील या गुणांच्या आधारेच लढणार आहेत. त्याने देशाचे, देशवासियांचे हित  नक्कीच साधले जाईल. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.