Breaking News

अमरनाथ यात्रेकरूंचा सामूहिक विमा तीन लाख करण्याचा निर्णय

श्रीनगर, दि. 28 - श्री अमरनाथ यात्रेसाठी येणा-या भाविकांच्या सामूहिक विम्यात एक लाखांवरून तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय अमरनाथ देवस्थान  मंडळाने घेतला आहे. या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नाथ वोहरा यांनी घोषणा केली. या वेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग नरूला हेही उपस्थित होते.
या घोषणेनंतर राज्यपाल वोहरा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नरूला यांनी बालटाला यात्रा मार्गाची हवाई पाहणी केली. या वेळी पवित्र गुफा, पंजतरणी, बालटाल  व दोमेल यात्रा शिबिरांचेही निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी नीलग्राथ हेलिपॅडचाही दौरा केला.
या वेळी राज्यपालांनी शिबिर संचालकांना योग्य ते नियोजन व लष्करासह सुरक्षा दलांना सुरक्षितता वाढवण्याचे निर्देश दिले. पुरेशा साफसफाईसाठी नियोजन केले  पाहिजे व कचरा नष्ट करण्यासाठी खोल खड्डे खोदले गेले पाहिजे. यात्रा मार्गात वीज, पाणी, स्वच्छता व स्नानगृहे यांच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दररोज 300  स्वच्छतागृहांची साफसफाई होण्याकडे व्यक्तीश: लक्ष देण्याचे निर्देश राज्यपालांनी शिबिर संचालकांना दिले.