Breaking News

पैशाची समजून कागदपत्रांची बॅग लांबवली; व्यापा-याची तीन लाखाची रोकड सुरक्षित

सांगली, दि. 30 - सांगली शहरातील अ‍ॅक्सिस बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या एका व्यापार्याची तीन लाख रूपये रोकड असलेली बॅग दुचाकीवरील अज्ञात  दोघांनी गुरूवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हिसडा मारून लंपास केली. मात्र पैशाची समजलेली ही बॅग प्रत्यक्षात कागदपत्रांची असल्याने संबंधिताने  सुटकेचा निःश्‍वास टाकला. परंतु बॅग लिफ्टिंगच्या संशयाने सांगली शहर पोलिसांसह सर्वांचीच काहीकाळ चांगलीच धावपळ झाली.
सांगली शहरातील गणेश मार्केट येथील कापड व्यापारी मेहताब रियाज शेख (रा. उदगाव वेस, पाटील गल्ली, काली मस्जिदजवळ, मिरज) तीन लाख रूपयांची रोख  रक्कम येथील अ‍ॅक्सिस बँकेत भरणा करण्यासाठी आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आले होते. आपली दुचाकी या बँकेशेजारील हॉटेल  बावर्चीनजीक पार्किंग करून मेहताब शेख बँकेत निघाले होते. त्याचवेळी समोरून अचानकपणे दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी त्यांना समोरून जोरदार धक्का  देऊन खाली पाडले व त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेऊन धूम ठोकली.
अवघ्या काही सेकंदातच घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या मेहताब शेख यांना सुरूवातीस पैशाचीच बॅग चोरीस गेल्याचा भास झाला. सांगली जिल्हाधिकारी व जिल्हा  न्यायाधीश यांच्या निवासस्थानासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. मेहताब शेख यांनी आरडाओरडा करताच बँकेतील व शेजारील नागरिक धावले.  आपल्याकडील रक्कम अज्ञाताने लंपास केल्याचे सांगताच अनेकांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आपली पैशाची नव्हे, तर कागदपत्रांची बॅग चोरट्यांच्या हाती लागल्याचे  लक्षात आल्यानंतर मेहताब शेख यांनी वस्तुस्थिती सांगताच उपस्थित सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. दरम्यान, चोरटे अ‍ॅक्सिस बँकेच्या सीसीटिव्हीच्या नजरेत  कैद झाले आहेत. याबाबत मेहताब शेख यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.