Breaking News

मिरज येथे आजपासून पाच दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

सांगली, दि. 30 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज या संस्थेच्यावतीने बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे उद्या 30 जून ते 4 जुलै असे एकूण पाच दिवस  वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती शासकीय वैद्यकीय माहविद्यालय मिरजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, या कार्यक्रमाचा मुख्य उदघाटन सोहळा वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबईचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांच्या हस्ते 2 जुलै रोजी  सकाळी साडे नऊ वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे होणार आहे. या कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्रातून अनेक प्रख्यात डॉक्टरांची व्याख्याने होणार आहेत.  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय परिषदेस नोंदणी केलेल्या उपस्थितांस महाराष्ट्र केमिकल काऊन्सिल, मुंबई  यांच्याकडून चार क्रेडीट पॉइन्टस् प्राप्त होणार आहेत.
या कार्यक्रमातंर्गत 30 जून ते 1 जुलै रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळांचे आयोजन, 2 जुलै रोजी मुख्य कार्यक्रम दोन सत्रात सकाळी 9 ते  सायंकाळी 5 पर्यंत, 3 जुलै रोजी दोन सत्रात केस पेपर प्रेझेन्टेशन, 4 जुलै रोजी प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम व सायंकाळी 5 वाजता थोर समाजसेवक पद्मश्री व रॅमेन मॅगसेसे  पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांच्याहस्ते मासिकाचे उदघाटन व मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  सांगली जिल्ह्यातील व पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी या कार्यक्रमास नोंदणी करून उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. पल्लवी सापळे यांनी केले आहे.