पंचायत समिती सदस्याच्या अपहरणाचा डाव उधळला
बीड, दि. 21 - बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या पचायत समिती गणाचे सदस्य बबन माने यांचे अपहरण करून त्यांना स्कॉर्पिओ गाडीतून नगरकडे जाणार्या आरोपींनी वाटेत नाकाबंदी करत उभ्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता चार पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करत मोठ्या धैर्याने बबन माने यांची सुटका केली व गाडीच्या चालकास शिताफीने पकडले. माने यांना आरोपी नगरकडे घेवून जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी पाटोदा येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली होती. मात्र आरोपींनी पेालिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना न डगमगता त्यांचा पाठलाग केला आणि डिघोळ रस्त्यावर त्यांना अडवले. अंधाराचा फायदा घेत यातील तीन आरोपी पळून गेले असले तरी गाडीचा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. माने यांची सुटका केली. या बहादूरपणाबद्दल त्यांना विशेष पोलीस महासंचालक अजित पाटील यांनी बक्षीस देवून कौतुक केले.
