औरंगाबाद जिल्हयात 266 बोगस वैद्यकीय व्यावसायिक
औरंगाबाद, दि. 21 - बोगस वैद्यकीय व्यावसायीकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरीता आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हयात अनधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांची संख्या 266 असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच बॉम्बे नर्सिंग अंतर्गत धडक मोहिमेत 305 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असता 204 रुग्णालये नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. आता पर्यंत फक्त दोन वैद्यकीय व्यावसायीकांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे डॉक्टर्स वैद्यकीय व्यवसायाला अपात्र आहेत अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धडक कारवाई करावी, असे यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी समिती सदस्यांना आदेशित केले. जे वैद्यकीय व्यवसायिक एम. डी. आहेत. त्यांनी कोणत्या विषयात एम.डी. केली त्याचा स्पष्ट फलक लावावा, असे यावेळी ठरविण्यात आले. बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी समितीच्या अशासकीय सदस्यांसह तालुका आरोग्य अधिकारी यांनी चर्चेत भाग घेतला.
