Breaking News

जमीनीच्या वादातून प्राणघातक हल्ला - आरोपींना अटक

अहमदनगर, दि. 10 - नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे जमीनीच्या वादातून बुधवारी झालेल्या हाणामार्यात रविंद्र रामदास भिसे (वय 30) गंभीर जखमी झाले असून,  त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. दिवाणी न्यायालयात दाखल केलेला दावा माघे घेण्यासाठी रविंद्र भिसे व त्यांच्या आई, वडिलांना मारहाण करुन  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 
रविंद्र रामदास भिसे यांच्या वडिलांना खंडू बाळू भिसे याने फसवणुक करुन शेतजमीन गट नं. 605 खरेदी केली. याबाबत रविंद्र भिसे यांनी दिवाणी न्यायालयात दावा  दाखल केलेला आहे. तसेच सावकारी कायद्याखाली जिल्हा उपनिबंधकाकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. न्यायालयात चालू असलेल्या वादाच्या शेतात  बुधवारी राजू पिंपरकर व त्याचा चुलत भाऊ बलू पिंपरकर ट्रॅक्टर घेवून शेतात काकरी पाळी घालण्यास आले. यावेळी त्यांच्या सोबत खालील सर्व आरोपी हातात  काठी, कुर्हाड व दगड घेवून आले होते. त्यांनी कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी शिवीगाळ सुरु केली. रविंद्र भिसे यांच्यावर खंडू भिसे याने कुर्हाडीने  प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. भांडण सोडविण्यासाठी रविंद्र भिसे यांचे वडिल रामदास व आई बायडाबाई मध्ये आले असता उपस्थितांनी त्यांना  देखील मारहाण करुन, केस मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रविंद्र भिसे यांनी फिर्यादित म्हंटले आहे. यानुसार खंडू बाळू भिसे, अंकुश बाळू भिसे,  पांडूरंग किसन भिसे, अमोल पांडूरंग भिसे, किसन जमा भिसे, बाळू जमा भिसे, सिंधूबाई बाळू भिसे, बायडाबाई गोरख थोरात (सर्व रा. गुंडेगाव) यांच्यावर भा.द.वी  कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी रविंद्र भिसे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, सदर आरोपींना रात्री उशीरा अटक करण्यात आली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा  दाखल झाला असून, तपास हेड कॉन्स्टेबल संपत खैरे करत आहे.