Breaking News

महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने

। मागासवर्गीयांवर होणार्‍या अत्याचाराबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी

अहमदनगर, दि. 10 - मागासवर्गीय चर्मकार समाजातील महिलेस मारहाण करुन, नग्नावस्थेत धिंड काढून करण्यात आलेल्या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ  राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. फरार आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर तातडीने कारवाई  करावी व मागासवर्गीयांवर होणार्या अत्याचाराबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, बाबासाहेब लोहकरे,  संभाजी आहेर, नवनाथ बोरुडे, पोपटराव बोरुडे, नरहरी खरात, भाऊसाहेब शिंदे, तुकाराम बोरुडे, चंद्रकांत जाधव, रोहीदास उदमले, किसनलाल बुंदेले, सोपान  आंबेकर, शांताराम बनसोडे आदि सहभागी झाले होते.
 बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड माईंबा येथे सदर घटना घडली असून, गुलाब उंबरकर व राधाबाई उंबरकर (पत्नी), रविंद्र व पंढरीनाथ उंबरकर (मुले) रस्त्याने जात  असताना सुखराम उगले यांनी बैल चोरुन जात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला. उगले यांनी त्यांचे नातेवाईक व गावकर्यांना बोलावून उंबरकर कुटुंबीयास बेदम  मारहाण केली. राधाबाई यांच्या अंगावरील वस्त्र काढून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांची गावातून नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. काही दिवसापुर्वी उत्तर  प्रदेशातही दलित चर्मकार कुटुंबीयांवर अत्याचाराची घटना घडली होती. मागासवर्गीयांवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना याबाबत शासनाने कठोर पावले  उचलावी. तसेच सदर घटनेतील मोजक्या आरोपींना अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट खाली अटक करण्यात आली असून, यामधील बरेच आरोपी अद्यापि  फरार आहेत. तरी फरार  आरोपींना तातडीने अटक करुन, सर्व अरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी  गोपीचंद कदम यांना देण्यात आले. मागासवर्गीयांवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना, कठोर पावले न उचलल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  देण्यात आला आहे.