Breaking News

दिव्यांग खेळाडू अभिजीत माने याला अहिल्यादेवी होळकर युवा गौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर, दि. 10 - नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील दिव्यांग खेळाडू अभिजीत जगन्नाथ माने याला जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या  वतीने क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर युवा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. माऊली सभागृहात  झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापुरचे उद्योजक जतनसिंह मेहता, राजेंद्र तागड, श्री वीर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी  विजयामाला माने, गणेश रहिकवार, श्रीकांत चेमटे, पै.नाना डोंगरे, रमेश गावडे, सुभाष जाडकर, मिना आढाव, सतिष लालबिगे, दशरथ मानवतकर, इंदुमती सावंत,  संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, प्रा.सुनिल मतकर, शरद दारकुंडे, अजय जाडकर आदि उपस्थित होते.
अभिजीत दिव्यांग असून, राज्यपातळीवर जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती कांतीलाल  जाडकर यांनी दिली. जतनसिंह मेहता म्हणाले की, जिद्दीपुढे आकाश ठेंगणे, याचे मुर्तीमंत उदाहरण अभिजीत आहे. दिव्यांग असून, अभिजीत याने जिद्द, मेहनत व  चिकाटीने जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. सामान्य विद्यार्थ्याला अपयश आले तर तो खचून जातो. मात्र अभिजीत याने परिस्थितीवर मात करुन  मिळवलेले यश इतर युवक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याला प्रेरणा देणारे त्याचे आई वडिल जगन्नाथ व सुनंदा माने यांचे विशेष कौतुक त्यांनी केले. अभिजीत  हा टिळक रोड येथील मतीमंद मुलांची शाळेचा विद्यार्थी असून, तो उत्कृष्ट जलतरणपटू आहे. त्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा  समन्वयक बाबाजी गोडसे, जिल्हाक्रीडा अधिकारी उदय जोशी, प्रशिक्षक रामदास ढमाले, रावसाहेब बाबर, गजानन चव्हाण यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.