मंत्रिमंडळ बैठकीवर या पुढेही बहिष्कार - दिवाकर रावते
मुंबई, दि. 08 - शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीवर बहिष्कार घातला . सेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर शिवसेना फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा सुरु झाली . कर्जमाफीच्या संदर्भात कोणताही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी शिवसेना नेतृत्वाला विश्वासात घेतले पाहिजे आणि कोणत्याही स्थितीत सर्व शेतकर्यांचे कर्ज माफ करा , अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे रावते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले होते . त्या नंतर रावते यांनी शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कार यापुढेही कायम राहणार असे जाहीर केले . दरम्यान कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शिवसेना नेतृत्वाला विश्वासात घेतले जाईल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले . आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहण्याची परवानगी शिवसेना मंत्र्यांनी मागितली होती . मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे विषय नसल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना अनुपस्थित राहण्यास परवानगी दिली , असे स्पष्टीकरण अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते . या पार्शवभूमीवर रावते यांनी आमच्या मागण्या मान्य झाल्याखेरीज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नाही असे जाहीर केल्याने शिवसेना नेतृत्व वेगळा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.