Breaking News

कास परिसरातील स्थानिक भुमीपुत्रांना त्रास दिल्यास आंदोलन : आ. भोसले

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : यवतेश्‍वर, कास परिसरात असलेल्या बांधकामांना जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान, याठिकाणी स्थानिक भुमिपुत्रांनीही त्यांच्या स्वमालकीच्या जागेत बांधकामे केली आहेत. त्यांच्या बांधकांमांना कोणत्याही परिस्थितीत हात लावू देणार नाही. स्थानिक भूमिपूत्रांच्या बांधकामांना हात न लावता बाहेरच्या लोकांनी केलेली बांधकामे शासनाने हटवावीत. मात्र, स्थानिकांना त्रास दिल्यास त्यास कडवा विरोध करुन तीव्र आंदोलन करु, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 
कास हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द आहे. यवतेश्‍वर, कास हा परिसर डोंगरी आणि दुर्गम परिसर असल्याने याठिकाणी मर्यादीत स्वरुपात शेती होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक भुमिपुत्रांनी त्यांच्या स्वत:च्या जागेत छोटी-मोठी हॉटेल्स सुरु करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु केला आहे. यापुर्वी या भूमीपुत्रांना घर सोडून मुंबई सारख्या ठिकाणी चाकरी करावी लागत होती. पण, पर्यटनामुळे स्थानिकांना हक्काच्या व्यवसायाची संधी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने यवतेश्‍वर, कास परिसरातील बांधकामे हटवण्याची नोटीस बजावली आहे. प्रशासनाने यवतेश्‍वर आणि कास परिसरात बाहेरच्या व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे अवश्य हटवावीत. याला आमचा विरोध नाही परंतु, स्थानिक भुमीपूत्रांची बांधकामे हटवण्यास आमचा कडवा विरोध राहील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिक भुमीपूत्रांनी सुरु केलेल्या व्यवसायावर प्रशासनाने बुलडोझर फिरवल्यास या भुमिपूत्रांना जमिनी विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हे लोक भुमिहीन होतील आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थलांतरीत व्हावे लागले. पुर्वी 8 ड नुसार नोंदी केल्या जात होत्या. मात्र आता शासनाने त्या बंद केल्या आहेत. शासनाने स्थानिक भुमीपूत्रांवर कारवाई केल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे शासनाने पुर्वीप्रमाणे स्थानिकांची बांधकामे नियमीत करुन द्यावीत आणि बाहेरच्यांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी. परंतु स्थानिक भुमिपुत्रांच्या एकाही बांधकामाला हात लावल्यास स्वत: रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन छेडू, असा गर्भित इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.