Breaking News

कापुस व्यापा-याची फसवणूक

औरंगाबाद, दि. 28 - उसनवारी तत्वावर कापसाच्या शंभर बंडलाचा माल मागवून पैसे न देता व्यापा-याची 21 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.  का प्रकार 23 मार्च ते 29 मार्च दरम्यान घडला. याप्रकरणी माल मागवणा-या आरोपीसह तामिळनाडू येथील श्रीअरुलमुरुगन मिल्सवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल केला. विनित सुरेशकुमार तायल (वय 35, रा. गुरिसहानीनगर, तिरुपती पार्क, एन चार, सिडको) हे कापसाचे व्यापारी असून, यांची टाउन सेंटर भागात  त्यांची श्री शंकर कॉटन कार्पोरेशन नावाने कंपनी आहे. कौशलजी नावाच्या व्यक्तीचा 23 मार्च रोजी मोबाइलवर कॉल आला. समोरील व्यक्तीने उसनवारी तत्वावर  राघवेंद्र टेक्सटाइल्स मिलया कंपनीस शंभर कापसाचे बंडल पाठविण्यास सांगितले; तसेच हा माल तामिळनाडूतील व्हनिला टेक्सटाइल्स (शामलापूरम, मरिअमन मंदिराजवळ, सोमनूर, जि.  कोईंबतूर) येथे पोचवण्यास सांगितले. तायल यांनी 21 लाख 91 हजारांचा माल नांदेड येथील चित्तूर ट्रान्सपोर्टद्वारे पाठविला. संशयित आरोपी कौशलजी याने हा माल  व्हनिला टेक्सटाइल्स येथे उतरवून न घेता परस्पर अरुलमुरुगन मिल (सोमनूर, जि. कोईमतूर) यांना विक्री केला. अरुलमुरुगन मिलच्या वतीने देखील तायल यांना  हा माल मिळाल्याचे सांगण्यात आले, मात्र तीन महिने उलटून गेल्यानंतरही आरोपी कौशलजी किंवा अरुलमुरुगन मिल यांनी तायल यांच्या बिलाची रक्कम दिली नाही.  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तायल यांनी रविवारी तक्रार दाखल केली.