Breaking News

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त सातार्‍यात मॅरेथॉन

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा यांनी रविवार, दि. 4 जून रोजी नो टोबॅको रन  संपूर्ण तंबाखू मुक्त मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी दिली.
या मॅरेथॉनचे नियोजन एलसोम व हॅपी पिपल सामाजिक सेवाभावी संस्था आणि वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्था यांनी केले आहे. चला तंबाखू मुक्तीचा नारा देवू .... चला बलशाली निर्व्यसनी युवा पिढी घडवू.... चला निर्मल आणि तंबाखू मुक्त जीवन निर्माण करु .... चला एकदा निर्धाराची दौड करु ... हे ब्रिद वाक्य घेवून व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते मॅरेथॉनची सुरुवात करण्यात येईल. सकाळी 6 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय येथून या मॅरेथॉनला सुरुवात होईल. मॅरेथॉन 10 कि. मी., 5 कि. मी. व 3 कि. मी. अंतराची आहे. 10 कि. मी. साठी जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार-पोवईनाका-दिगविजय चौक-राजपत-राजवाडा सर्कल मारुन राजपत-पोवईनाका-सिव्हील हॉस्पिटल असा मार्ग राहील. 5 कि. मी. साठी जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार-पोवईनाका-जिल्हा परिषद- बॉम्बे रेस्टॉरंट-यु टर्न घेवून जिल्हा परिषद मार्गे पोवईनाका-जिल्हा रुग्णालय तर 3 कि. मी. साठी जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार -पोवई नाका-जिल्हा परिषद - युटर्न घेवून पोवई नाका-जिल्हा रुग्णालय असा मार्ग राहील.
यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, पोलीस अधिक्षक संदिप पाटील उपस्थित राहणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणीसाठी जिल्हा रुग्णालय दुरध्वनी क्र. (02162) 235023, वात्सल्य सामाजिक संस्था 9822755987, हॅपी पिपल सामाजिक संस्था 9545344443, रुप समिर स्टाईल, पोवई नाका येथे मोफत नाव नोंदणी करता येईल. मॅरेथॉनमध्ये साताराकरांना मोफत सहभाग घेता येणार असून स्पर्धकांना मॅरेथॉन मार्गावर पाणी, ओ. आर. एस., बिस्कीटे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, असे डॉ. भोई यांनी सांगितले आहे.