Breaking News

वृक्ष लागवडीचे मिशन यशस्वी होण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक - सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 - राज्यात 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड होणार असून वृक्ष लागवडीचे हे मिशन यशस्वी होण्यासाठी राज्यातील सर्व  जनतेचा या मिशनमध्ये सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्याला झाडे तोडणार्‍या हातांपेक्षा झाडे लावणार्‍या हातांची संख्या वाढवायची आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या  33 टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्राचे वनक्षेत्र हे 20 टक्के आहे. ते 33 टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर वन जमिनीबरोबर वनेतर  जमिनीवरही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार संकल्पनेप्रमाणे वनयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्याचेही वन विभागाने निश्‍चित केले  असून येत्या तीन वर्षात राज्यात लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. वन विभागाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पात  विविध शासकीय विभागांबरोबर सामाजिक, स्वयंसेवी आणि आध्यात्मिक संस्थांनी गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही उत्स्फुर्त सहभाग नोंदवत वृक्ष लागवड करण्याचे निश्‍चित  केले आहे. सर्वसामान्य जनतेचा, सर्व संस्था आणि उद्योग-व्यापारी जगताचा या मिशनमधील सहभाग उत्साहवर्धक आहे.
जागतिक तापमान, ऋतू बदल आणि पर्यावरणीय समस्यांचा यशस्वीपणे सामना करावयाचा असेल तर वृक्ष लागवड हा महत्वाचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असून  प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून पर्यावरण रक्षणाचे सेनापती व्हावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत संपन्न होणार असून याचा शुभारंभ कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 1 जुलै  2017 रोजी ऐरोली, नवी मुंबई येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र येथे सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शासकीय वृक्ष  लागवडीशिवाय वैयक्तिक, संस्थात्मक आणि संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत आहे. या वृक्ष लागवडीची माहिती शासनाकडे नोंदवली जावी  म्हणून वन विभागाने चू झश्ररपीं नावाचे मोबाईल प तयार केले आहे. 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत सर्व संबंधितांनी केलेली वृक्ष लागवड या मोबाईल पद्वारे  वन विभागाकडे नोंदवावी, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
राज्यात वृक्ष लागवडीसाठी 16 कोटी 60 लाख 10 हजार रोपे विविध रोपवाटिकांमधून उपलब्ध आहेत. रेल्वे जमिनी, संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या जमिनी,  राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी संबंधित मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मराठवाड्यात इको बटालियन मार्फत वृक्षाच्छादन  वाढवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम विभाग हाती घेत आहे. लवकरच ही बटालियन स्थापन होईल, असेही वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वन विभागामार्फत रोपे आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जिल्हा, तालुकास्तरीय समित्यांची स्थापना, समन्वय  अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून कोणते वृक्ष कुठे आणि कसे लावायचे याचे वन विभागाकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचेही वनमंत्र्यांनी यावेळी  सांगितले. पत्रकार परिषदेत वनमंत्र्यांनी हरित सेना आणि 1926 हॅलो फॉरेस्ट या वन विभागाच्या उपक्रमांचीही माहिती दिली. वन विभागाचे सचिव विकास खारगे  यांनी यावेळी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सविस्तर सादरीकरण केले.