Breaking News

श्रीचैतन्य महाराज पालखीला उदापुरच्या सर्जा-राजाची बैलजोडी

अकोले, दि. 10 - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानल्या जाणार्‍या पंढरपूर निवासी पांडुरंग भगवान आणि रुख्मिणी मातेची आषाढी वारीतील श्री .चैतन्य  महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा बहुमान उदापुरचे प्रगतीशील शेतकरी शंकर शिंदे (होडीवाले)यांच्या सर्जा -राजा या बैलजोडीला मिळाला आहे अशी  माहिती श्री.चैतन्य महाराज सेवा मंडळ वारकरी समाज जुन्नर -आंबेगाव -खेड तालुक्याचे संचालक दत्तात्रय काशिनाथ कुलवडे, तसेच सल्लागार रविंद्र रा. शेटे यांनी  उदापुर येथे दिली.
या पालखीचे प्रस्थान गुरुवार दि .15 जून सकाळी अकरा वाजता श्रीक्षेत्र ओतूर येथून होणार असून त्यापूर्वी सकाळी 9 वाजता उदापुर येथून पालखी रथाची विधिवत  पूजा करून टाळ-मृदंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजरात मिरवणुकीने ओतूर येथे पालखी रथाचे आगमन होईल. गेली 27 वर्षापासून या पालखीला बैलजोडी जुंपण्याचा  मान उदापुरला देण्यात आला असून दरवर्षी नागपंचमीच्या गावच्या ग्रामसभेत या विषयावर सार्वजनिक चर्चा होऊन सर्वमताने बैलजोडी जुंपण्याचा दिला जातो, यावर्षी  तीन शेतकर्‍यांनी ग्रामस्थांना चिट्ठी देऊन विनंती केली होती. उपस्थित मान्यवरांनी या वेळी गावच्या विकासात सदैव सहकार्य करणारे व माजी ग्रामपंचायत सदस्य  सचिन शंकर शिंदे यांचे वडील व भैरवनाथ भजन मंडळाचे खास सदस्य शंकर शिंदे अर्थात होडीवाले यांच्या विनंतीला सहानुभूतीपूर्वक विचार करून एकमताने यावर्षी  पालखीस बैलजोडी जुंपण्याचा मान दिला आहे. त्यानंतर त्यांनी खास रथासाठी बैलांची क्षमता, त्यांचे वशिंड, शिंगे, रंग, शेपटी, नख्या, त्यांची चाल इत्यादी बाबी  पाहणी करून सर्जा - राजा या दिड लाख रुपयांची बैलजोडीची निवड केली. याबाबत शंकर शिंदे (होडीवाले) यांनी  सांगितले कि गेली पाच वर्षापासून आम्ही या  संधीची वाट पहात होतो, परंतु गावच्या नियमा पुढे चिट्ठी पद्धत असल्याने सरळ कोणास बैलजोडी जुंपण्याचा अधिकार नसतो. यावर्षी माझ्या सेवेचा विचार करून  गावकर्‍यांनी मला पालखीला बैलजोडी जुंपण्याचा मान दिला त्यामुळे आमच्या सर्व कुटुंबाला आनंद झाला, सर्जा -राजा हि जोडी खास या पालखीच्या रथासाठी  खरेदी केली असून घरात वारकरी सांप्रदाय असून गेली अनेक वर्षे पायी वारी करीत आहोत.  एक महिन्यापूर्वी पत्नीचा जीवघेणा अपघात झाला मात्र पांडुरंगाची कृपा  म्हणून त्या बचावल्या मात्र अजूनही त्या कोमात असल्याने या बैलजोडीची सेवा कमी केली नाही. या जोडीला दररोज स्वच्छ पाण्याने धुतले जाते, त्यांना योग्य खुराक  दिला जातो. जोडीला सजविण्यासाठी सर्व साहित्य खरेदी केले असून पालखीच्या पायी वारीसाठी लागणारे चाळीस दिवसांची आतुरतेने वाट पहात आहोत जेणे करून  पांडुरंगाला पत्नी सुखरूप व्हावी म्हणून साकडं घालावयाचे आहे.  आजपर्यंत सर्व नियोजन आणि आधारस्तंभ म्हणून ह. भ. प. विठ्ठल महाराज मांडे (शिवनेर भूषण)  हे पाहात आहेत.