Breaking News

गुंजाळवाडी पठार येथे दरोडा; दांम्प्त्याला दांडक्याने मारहाण

संगमनेर, दि. 10 -  घराचा दरवाजा लाथांनी तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी दोघा वृध्द दाम्प्त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांच्याजवळील 50 हजार  रुपये रोख, 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना काल गुरुवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील गुंजाळवाडी पठार येथे घडली. या घटनेने  तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घरात वृध्द दांमप्त्य एकटेच असल्याचा फायदा घेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा लाथांनी तोडून घरात प्रवेश केला. शांत राहण्याची धमकी  देत या चोरट्यांनी दोघा दांम्प्त्याला लाकडी दांड्यांनी जबर मारहाण केली. यात सुदाम रंगनाथ आगलावे (वय75) व त्यांची पत्नी राहीबाई सुदाम आगलावे (वय60)  हे गंभीर जखमी झाले. या दाम्प्त्याने नुकतेच पिक विम्याचे 50 हजार रुपये काढून घरात आणून ठेवले होते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 50 हजार रुपये रोख व  राहिबाई यांच्या गळ्यातील डोरले, कानातील सोन्याची फुले असे सुमारे दोन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी  लांबविले. घटनेपूर्वी चोरट्यांनी आसपासच्या घराच्या कड्या  लावून घेतल्या होत्या. त्यामुळे राहिबाईचा आरडा-ओरडा ऐकूनही परिसरातील नागरीकांना काहीच मदत करता आली नाही. दरम्यान सुदाम आगलावे यांनी घारगाव  पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तास सहाय्यक फौजदार के. एम. परांडे करीत आहे.