Breaking News

शेतकर्‍यांसाठी पीक कर्ज वाटप मेळावे घ्या : श्‍वेता सिंघल

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकर्‍यांसाठी पीक कर्ज वाटप मेळावे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर ठिबक सिंचन कर्ज मागणीसाठी  आलेला अर्ज परत जाता कामा नये, त्यासाठी सर्व बँकांनी आवश्यक ती पूर्तता करुन मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना कर्ज वितरीत करावे. हा शासनाच्या प्राधान्याचा  विषय आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  राजेश देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्राचे अंचल प्रबंधक हरिश्‍चंद्र माझीरे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक विद्याधर साहू, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव  शिरोळकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुबोध अभ्यंकर, आरबीआयचे हेमंत दंडवते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंघल यांनी आढावा घेऊन मार्च 2017 च्या पतपुरवठा आराखडा 108 टक्के उद्दीष्ट साध्य केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन त्या म्हणाल्या, या वर्षी  सर्वांनी चांगले काम करावे. बँकानी अधिकाधिक पीक कर्ज वितरण मेळावे घ्यावेत. शेतकर्‍यांना जास्तीत-जास्त पीक कर्जांचे वितरण करावे. पाठपुरावा करुन  त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करावी. ठिबक सिंचनसाठी आलेल्या अर्जांबाबत बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज द्यावे. कागदपत्रांची काही ठिकाणी कमतरता असल्यास  बँकांनी संबंधितांकडून पाठपुरावा करुन पूर्तता करावी. पुढील बैठकीपासून याचा स्वतंत्र आढावा घेतला जाईल याची नोंद घ्यावी. शासनाच्या सर्वच योजनांची तसेच  विविध महामंडळांची कर्जप्रकरणे मार्गी लावावीत, अशा सूचना करुन सिंघल म्हणाल्या, तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर मेळाव्यांचे आयोजन करुन तालुका कृषी  अधिकारी, तहसिलदारांचे सहकार्य घ्यावे. मानवतेचा दृष्टीकोन ठेवून सर्वसामान्य शेतकर्‍यांना तसेच लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ द्या, असे आवाहन त्यांनकेले.
मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानामध्ये जिल्ह्याला अग्रेसर ठेवल्याबद्दल सर्व बँकाचे अभिनंदन करतो. येथून पुढेही बँकांचे  असेच सहकार्य राहील, अशह अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. विविध महामंडळांच्या कर्ज प्रकरणांबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करु, असेही ते म्हणाले. यावेळी अभ्यंकर,  दंडवते यांनी मार्गदर्शन केले. शिरोळकर यांनी आभार मानले.