Breaking News

ग्रामविकासाच्या बदलत्या परिपत्रकाने शिक्षक हैराण

सातारा, दि. 12 - शासनाच्या बदली धोरणाबाबत ज्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत व ज्या न्यायालयीन प्रकरणात जैसे थे ठेवण्याचे  आदेश दिलेले आहेत त्या शिक्षकांच्या जागी बदली अधिकार प्राप्त, बदली प्राप्त शिक्षकांना पसंतीक्रम देता येणार नाही, असा आदेश काढण्यात आला. पुन्हा या  आदेशात बदल करण्यात आला असल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सतत बदलणा-या परिपत्रकाने शिक्षक वर्ग हैराण झाला आहे. सुमारे 5 महिन्यात 5  परिपत्रके काढण्यात आली असल्याने झेडपीच्या शिक्षण विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीबाबत शाळेतील बदलीपात्र रिक्त जागांची यादी घोषित करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली करण्याबाबत शासनाने सुधारित धोरण जाहीर केले आहे.त्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना बदलीसाठी त्यांच्या पसंतीच्या  जास्तीत जास्त 20 पसंतीक्रम नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्यासाठी, बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र शिक्षकांच्या  यादीबरोबरच शाळेतील ज्या रिक्त पदावर बदली होऊ शकते, अशा शाळेतील रिक्तपदांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात यावी, असेही ग्रामविकास विभागाने आदेशात  म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सुधारित बदलीच्या धोरणाविरुद्ध काही शिक्षकांनी, शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालय मुंबई, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ व  नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली आहे.या प्रकरणी काही याचिकेवरील सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांपुरते जैसे थे आदेश पारित केलेले  आहेत. अशा प्रकारे ज्या ठिकाणी जैसे थेचे आदेश पारित केलेले आहेत त्या संबंधित शिक्षकांच्या जागांवर बदली अधिकार प्राप्त, बदली पात्र शिक्षकांना पसंतीक्रम देता  येणार नाही. तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार समप्रमाणात रिक्त ठेवण्याच्यादृष्टीने शाळानिहाय रिक्त जागा घोषित केलेल्या आहेत. त्या जागांवरसुद्धा पसंतीक्रम  देता येणार नाही. याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात केल्या होत्या.
शासनाच्या बदली धोरणाबाबत ज्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत व ज्या न्यायालयीन प्रकरणात जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत  त्या शिक्षकांच्या जागी बदली अधिकार प्राप्त, बदली प्राप्त शिक्षकांना पसंतीक्रम देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.हा आदेश रद्द करण्यात येत आहे.ज्या  शिक्षकांच्याबाबत न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या शिक्षकांच्या जागेवर जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेअंतर्गत पसंतीक्रम देता येतील, मात्र त्या  शिक्षकांच्या जागेवर होणारी बदली ही न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून असणार आहे, असे बुधवारी नव्याने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे  शिक्षकांना पसंतीक्रम ठरवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ग्रामविकास विभागाच्या सतत बदलणा-या परिपत्रकामुळे शिक्षक वर्गही हैराण झाला असून  झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागापुढे पेच निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.