Breaking News

चोरीच्या उद्देशाने दोघांचा खून; एकाला अटक

पुणे, दि. 12 - लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवतीच्या खून प्रकरणाचा तब्बल दोन महिन्यानंतर उलगडा झाला आहे. चोरीच्या उद्देशानेच या दोघांचा  खून करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी एका मारेकर्‍याला ताब्यात घेण्यात यश आले असून दुसरा मारेकरी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे दोन्ही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरीचे गुन्हे असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच हा खून झाला असावा, असा  प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस. पॉईंट डोंगरावर 2 एप्रिल रोजी रात्री तरुण-तरुणीचा खून करण्यात आला होता. यात सिंहगड महाविद्यालयात  अभियांत्रिकीच्या तिस-या वर्गात शिकणारा सार्थक वाकचौरे व पुणे जिल्हातील जुन्नरची श्रुती डुंबरे यांचा दगडाने डोक्यात व शरीरावर वार करून खून करण्यात आला  होता. 3 एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिकार्‍यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना तांत्रिक माहितीच्या आधारे  पोलिसांनी तपास केला. मृत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित, अशा जवळपास 2 हजारांहून अधिक जणांची चौकशी  पोलिसांनी केली होती.