Breaking News

शासनाच्या बेकायदा ऑनलाईन औषध विक्री व ई-पोर्टलला विरोध

संगमनेरातील औषधे दुकानांचा एक दिवशीय बंद

संगमनेर, दि. 01 - देशात व राज्यात इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून बेकायदा ऑनलाईन औषध विक्री व ई-पोर्टलबाबत शासन व प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमिवर संगमनेर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या आंदोलनात सहभाग दर्शवीत, तालुक्यातील औषधे दुकाने व व्यवहार बंद ठेवले. शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करून विविध मागण्याचे निवेदन महसुल व पोलिस प्रशासनाला संघटनेच्या वतीने देण्यात आले.
शासनाने जाचक धोरण स्विकारल्यामुळे इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून बेकायदा ऑनलाईन औषध विक्री व ई-पोर्टलमुळे नशा व गर्भपातासह इतर बेकायदा औषधे जनतेला सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. यामुळे रूग्णाचा फॉलॉप घेता येणार नाही, तसेच यात परदेशी सेवेची तरतुद नाही यामुळे खेड्यापाड्यातील व शहरातील याचा विपरीत परिणाम होवून हा व्यवसाय बंद पडेल. जवळपास 50 लाख व्यावसायिक व कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. ई-पोर्टलने देश व राज्यातील खेडे व शहर जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र खेड्यापाड्यातील विजेचा प्रश्‍न, इंटरनेटची सुविधा नाही. वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांची असे गंभीर प्रश्‍न भेडसावणारे असल्याने या शासनाच्या भूमिकेला अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विरोध दर्शविला आहे.
शासना व प्रशासनाच्या या जाचक धोरणाच्या विरोधात संघटनेच्या वतीने काल देशव्यापी बंद आवाहन करण्यात आले होते. या देशव्यापी बंदमध्ये येथील संगमनेर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभागी होवून तालुक्यातील औषधे दुकाने व व्यवहार बंंद ठेवून निषेध नोंदविला. शासन विरोधी घोषणा बाजी करून प्रशासन व नागरीकांचे लक्ष केंद्रीत करण्यात आले. संघटनेच्या वतीने तहसिलदार साहेबराव सोनवणे व पो. नि. गोविंद ओमासे यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष चेतनकुमार कर्डिले, सचिव अतुल चांगले, अमोल गागरे, खजिनदार किशोर देशमुख, सुहास लेंडे, आयुब मणियार, गणेश भंडारे, रावसाहेब दिघे, राजेंद्र अरगडे, दत्ता हांडे, गुणवंत हजारे, रविंद्र दिघे, सचिन घुले, निलेश पावबाके, संदिप गुंजाळ, अमित गायकवाड, विनोद वडनेरे, राजु मुर्तडक, कृष्णा कमठम आदींसह व्यावसायिक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.