Breaking News

वारकर्‍यांची ताडपत्री खरेदी ’पारदर्शकच’; आयुक्त श्रावण हर्डीकर

पुणे, दि. 21 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या ताडपत्री खरेदीत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. ही खरेदी  प्रक्रिया ’पारदर्शकच’ झाल्याचा खुलासा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी महापौर नितीन काळजे, स्थायी सभापती सीमा सावळे उपस्थित  होत्या.
पिंपरी महापालिकेकडून वारकर्‍यांना दरवर्षी भेटवस्तू दिल्या जातात. यावर्षी सत्ताधारी भाजपने ताडपत्री देण्याचा निर्णय घेतला. मात्र या खरेदीत भाजपने तब्बल  साडेसहा लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादीसह शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यामुळे पारदर्शी काम करत असल्याचे सांगणार्‍या भाजपचे  धाबे चांगलेच दणाणले होते. मुंबईतून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामुळेच सत्ताधार्‍यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आयुक्तांना खुलासा  करायला लावला.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, ताडपत्री खरेदीची निविदा विहित पद्धतीने राबविली होती. पहिली निविदा 26 मेला प्रसिद्ध केली. तिची मुदत 7 दिवसांची होती,  त्यात एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही. त्यानंतर 2 जूनला दुसर्‍यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यात एकाने निविदा सादर केली, त्यानंतर पुन्हा मुदतवाढ  देण्यात आली. त्यावेळी रेखा इंजिनियरिंग, सिद्धी कॉपीयर्स, एमपी इंजिनियरिंग, धर्मे इंटरप्रायजेस, माणिकचंद हाऊस अशा 5 जणांनी निविदा सादर केल्या होत्या.  त्यापैकी अधिकृत वितरकाचे प्रमाणपत्र नसल्याने 3 ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले. त्यापैकी सिद्धी कॉपीयर्सने 3 हजार 412 रूपये आणि धर्मे इंटरप्रायजेसने 3  हजार 600 रूपये प्रति ताडपत्री असा दर दिला होता. त्यामुळे कमी दराची निविदा म्हणून मे. सिद्धी कॉपीयर्सला काम देण्यात आले आहे. ही खरेदी प्रक्रीया ई  टेंडरींगची असल्यामुळे यात कोणताही भ्रष्टाचार होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. ही खरेदी पारदर्शकच असल्याचे आयुक्त हर्डीकर म्हणाले.