Breaking News

सांगली जिल्हा परिषदेचा अमिताभ बच्चन यांच्याकडून गौरव

सांगली, दि. 01 - हागणदारीमुक्त होणारा सांगली जिल्हा राज्यात चौथा जिल्हा ठरल्याने मुंबई येथील कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याहस्ते सांगली जिल्हा  परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांना गौरविण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात या राज्यस्तरीय स्वच्छता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज्यात पहिल्या  टप्प्यात संपूर्ण हागणदारीमुक्त झालेल्या 11 जिल्हा परिषदांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमिताभ बच्चन, केंद्रीय  पेयजल व स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर, ग्रामीण विकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे- पालवे, पेयजल व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व केंद्रीय सचिव परमेश्‍वर  अय्यर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्याहस्ते सांगली जिल्हा परिषदेचा मानपत्र व गौरवचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने व उपमुख्य कार्यकारी  अधिकारी श्रीमती दीपाली पाटील यांनी स्वीकारला.
सांगली जिल्हा परिषदेत वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याची किमया साधली आहे. या वर्षभरात 68 हजार शौचालये बांधण्यात आली आहेत. सांगली  जिल्ह्यातील 71 हजार 52 कुटुंबांकडे शौचालय उभारणी करून संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट सांगली जिल्हा परिषदेस देण्यात आले होते. त्यानुसार  सांगली जिल्हा परिषदेने 98 टक्के काम करून मगच जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती.