Breaking News

शहरातील पेट्रोलपंपाची तपासणी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाशिक, दि. 21 - नाशिक शहरातील सर्व पेट्रोलपंपाच्या मशीनची तपासणमीटरमध्ये फेरफार करणार्‍या दोषी पेट्रोलपंप चालकांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना दिले. या वेळी कार्याध्यक्ष चिन्मय गाढे,  नाशिकरोड अध्यक्ष सनी ओबेरॉय, महेश सोनवणे, समीर रत्नपारखी, नवराज रामराजे, हिमांशू चव्हाण, विवेक जैन, परिमल फड आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिकातील पेट्रोलपंपावर सुरु असलेल्या इंधन चोरीमुळे ग्राहकांच्या वाहनात कमी इंधन भरले जात आहे तसेच भेसळयुक्त इंधनामुळे वाहनांमधील इंजिन खराब होत  असल्याने वाहनधारकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पंपावर इंधन भरल्यानंतर वाहनातील इंधन मीटरवरील काटा पुढे सरकत नसल्याने  तसेच गाडी कंपनी अ‍ॅव्हरेज देत नसल्याने अनेक वाहनधारकांचा पेट्रोलपंपावरील इंधन चोरीवरील संशय बळावला आहे. परंतु याबाबतची तक्रार कोणाकडे करायची व  इंधनाचे मोजमाप कसे करायचे याबाबत जनता अनभिज्ञ असल्याने पेट्रोलपंप चालक याचा गैरफायदा उचलत आहे. या इंधनचोरीबाबतची जनजागृती करण्याची गरज  असून प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे असे या निवेदनात म्हटले आहे.