Breaking News

कोकणगाव येथील खुनाची उकल ; मुलानेच केला आई -वडील, भावाचा खून

नाशिक, दि. 09 - भावाबद्दलचा तीव्र द्वेष, आई वडिलांसोारा सततचा वाद, भावाकडून अनैतिक संबंधांवरून होणारे आरोप, सततचा कौटुंबिक कलहा यातून  राग अनावर झाल्याने पोटच्या मुलानेच आई - वडिल आणि लहान भावाचे हत्याकांड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस  अधीक्षक अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी सोमनाथ जगन्नाथ शेळके (21, रा. कोकणगाव, ता. दिंडोरी) यास पोलीसांनी अटक केली आहे. दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव येथे 30 मे रोजी  जगन्नाथ शेळके, शोभा शेळके आणि हर्षद शेळके अशा एकाच कुटुंबातील तिघांचा निर्घृन खून झाल्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तीघांच्या  डोक्यात शस्त्राने वार करून खुन केला होता.
मात्र तिघांच्याही मरील किंवा घरातील किंमती चीजवस्तू चोरी न गेल्याने हत्याकांडाचे कारण अस्पष्ट होते. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात जगन्नाथ शेळके यांचा  थोरला मुलगा सोमनाथ शेळके याने फिर्याद दिली होती. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे,  अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना केल्या.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तीन पथके नेमून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. यासाठी त्या कोकणगाव परिसरात गुप्त  कर्मचारी पेरण्यात आले होते. पोलीसांनी या घटनेबाबत सोमनाथ याच्याकडे विचारपूस सुरू ठेवली होती. यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली, तसेच त्याच्यावर  पाळत ठेवली असता त्याच्या संशयास्पद हालचाली पोलिसांना आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी सोमनाथ कडे सखोल चौकशी केली असता त्याने तिघांचाही खून  केल्याची कबुली दिली.
सोमनाथचे त्याच्या आंसोबत नेहमीच वाद होत होता. घरातील मोठा मुलगा असताना शेतात काम करूनही वडिल जगन्नाथ नेहमी त्रास देत होते. लहान भाऊ हर्षद  काहीही कामधंदा करत नव्हता तरी त्यास वडिल काहीच बोलत नसल्याचा राग सोमनाथच्या मनात होता. त्यातच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हर्षदच्या  अनैतिक संबंधावरून आई वडिल आणि सोमनाथमध्ये जोरदार भांडणे झाली होती.
जगन्नाथ शेळके यांनी सोमनाथवर हर्षदसारखा दारु पितो, तुझेपण अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. त्यावरून तिघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने संतापाच्या भरात  सोमनाथने घरातच पडलेल्या ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने तिघांच्या डोक्यात वार करून खून केले. तर आपण घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी तीघांचा खून केल्याची तक्रार  स्वतः सोमनाथने देऊन तो पोलीसांची तपासाची दिशा भरकटवत होता. अखेर पोलीसांनी त्यालाच शिताफीने अटक करून हे हत्याकांड उघडकीस आणले.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, अरुण  पगारे, रामहरे, हवालदार रविंद्र वानखेडे, कैलास देशमुख, अमोल घुगे आदींनी केला.