Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मोडासा मधील जलप्रकल्पांचे उद्धाटन

अहमदाबाद, दि. 01 - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौ-यावर असून आज त्यांनी मोडासा मधील दोन जलप्रकल्पांचे उद्धाटन केले.पंतप्रधान मोदी  यांनी अरावलीमध्ये एका पाणीपुरवठा योजनेची सुरुवात देखील केली. याव्यतिरिक्त त्यांनी आदिवासी आणि तरुणांना संबोधित केले.दरम्यान, पंतप्रधान गांधीनगरमधील  महात्मा मंदिरात इंटरनॅशनल टॅक्सटाईल परिषदेमध्येही उपस्थित राहणार आहेत. 
भारतीय जनता पक्षाला गुजरातमधील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भाजपने ज्या- ज्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याठिकाणी भाजपने  जनतेचाच विचार केला आणि जनतेने नाव ठेवावीत अशी एकही जागा सोडलेली नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना म्हटले.
संपूर्ण देशभरात गुजरातमधील विकासाच्या प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. भाजप सरकारने अन्य सरकारप्रमाणे लालसेपोटी कोणतेही काम केले नाही. आम्ही केवळ  जनतेचा विचार केला. गुजरातचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीला मुबलक पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. तसेच येथील तरुण पिढीला  शिक्षित करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारल्याचेही ते म्हणाले.  केंद्र सरकारने शेतक-यांसाठी आमलात आणलेल्या इनाम योजनेअंतर्गत शेतकरी आता 400  बाजारपेठांशी मोबाईलद्वारे जोडले जाणार आहेत. ज्या राज्यात पिकाला जास्त दर आहे त्या राज्यात शेतकरी आपल्या धान्याची विक्री करु शकणार आहे. असेही  पंतप्रधानांनी सांगितले.