Breaking News

मुक्त विद्यापीठाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाशी शैक्षणिक करार

नाशिक, दि. 06 - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्यात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात  आला. या कराराद्वारे दोन्ही विद्यापीठांचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांचे आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्याचा वापर अथवा अनुवाद  करण्यात येणार आहे. दोन्ही विद्यापीठांनी एकमेकांचे शिक्षणक्रम स्वीकारल्याने शैक्षणिक व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे राज्यातील  असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. हेमंत राजगुरू आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. रवींद्रकुमार, कुलसचिव एस. के. शर्मा यांची दिल्लीत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दोन्ही विद्यापीठांचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी  शिक्षणक्रमांचे आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्याचा अनुवाद करून ते वापरण्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान याबाबतचा शैक्षणिक करार करण्यात आला असून  या करारावर दोन्ही विद्यापीठाच्या कुलसचिवांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. यामुळे एका विद्यापीठाचे शैक्षणिक साहित्य दुसर्‍या विद्यापीठाला वापरता येवून अनावश्यक  पुनरुक्ती टाळता येईल; तसेच मुद्रित पुस्तकांबरोबरच अन्य पूरक शैक्षणिक साधनांचा वापर देखील दोन्ही विद्यापीठे करू शकतील.
यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी नोंदणी विभागाच्या कुलसचिव प्रा. श्रीलता, शैक्षणिक समन्वय विभागाचे संचालक प्रा. बी.बी. खन्ना, संचालक  विभागीय सेवा विभागाचे संचालक डॉ. वेणुगोपाल रेड्डी, वित्त अधिकारी प्रा. रविशंकर आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे असंख्य विद्यार्थ्यांना सध्या  सुरु असलेल्या शिक्षणक्रमांच्या व्यतिरिक्त अन्य शिक्षणक्रमांस प्रवेश घेता येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणक्रमांस प्रवेश घेवू इच्छिणार्‍या  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणक्रम उपलब्ध होणार आहे. दोन्ही विद्यापीठे दूर शिक्षणातच काम करीत  असल्याने शैक्षणिक आदानप्रदान होण्यास मोठी मदत होईल. यापैकी काही शिक्षणक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येतील, असे यशवंतराव चव्हाण  महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी सांगितलेे.