Breaking News

सत्तेचे फळे चाखून टिंगल करणा-यांनी सरकारबाहेर पडावे - एकनाथ खडसे

जळगाव, दि. 30 - महाराष्ट्र सरकार स्थिर आणि भक्कम आहे. परंतु सहयोगी पक्षातील काही नेते सरकारवर टीका करतात. पंतप्रधान व मुख्यमंत्र्याच्या आवाजाची  नक्कल करून टिंगल करतात. सत्तेचे फळे चाखून असे करणे योग्य नाही. त्यापेक्षा त्यांनी सरकारबाहेर पडावे, असा ईशारा भाजपचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री  एकनाथराव खडसे यांनी दिला आहे.
मुक्ताईनगर येथे पक्ष विस्तारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्म हाऊसवर विस्तारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी  भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकरसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. खडसे म्हणाले, राज्यातील सरकार भक्कम आहे, सरकारला कोणताही धोका नाही. मात्र सरकारमधीलच सहयोगी पक्षातील काही नेते सरकारवर  टिका करतात. काही नेते तर थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याची नक्कल करून त्यांची टिंगल करतात. सरकामध्ये राहून सत्तेची फळे चाखतात दुसरीकडे त्याच  सरकारच्या विरूध्द बोलतात . हे योग्य नाही. जर त्यांना विरोधच करायचा असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे.
पक्षाचा विस्तार करण्याचे अवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. काही लोक निवडून येईपर्यंत पक्षाचे काम करतात परंतु निवडून आल्यानंतर भलतीकडेच लक्ष घालतात  असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पक्षाचे विस्तारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.