Breaking News

शिवराय-शाहु महाराज हेच बहुजनांचे उध्दारकर्ते - संभाजी महाराज

औरंगाबाद, दि. 28 - छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जाती-जमातीच्या मावळयांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. तर याच समाजाला ’बहुजन’ हा  प्रतिशब्द देऊन शाहू महाराजांनी सामाजिक उध्दार केला. ’फुले-शाहु-आंबेडकर विचारधारा’ हाच खरा महाराष्ट्राच्या हिताचा विचार आहे, असे प्रतिपादन खासदार  छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात नव्हतेअसे मत व्यक्त करून खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी शरद पवारांचीच  भूमिका पुढे नेली.
राजर्षी शाहू महाराज अध्यासन व छत्रपती शिवाजी अध्यासन केंद्रातर्फे सामाजिकन्याय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास खासदार संभाजी महाराज, ज्येष्ठ  विचारवंत प्राचार्य टी.एस.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, परीक्षा मंडळ  संचालक डॉ.राजेश रगडे, वित्त व लेखाधिकारी नंदकुमार राठी, संचालक डॉ.राजेश करपे, डॉ.राम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाजी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात स्वराज्य निर्माण केले. तर दोनशे वर्षानंतर शाहु महाराजांनी याच कष्टकरी समाजाला  ’बहुजन’ हा प्रतिशब्द देऊन संघटीत केले. कोल्हापूर संस्थानात 23 टक्के निधी शिक्षणावर खर्च करुन शिक्षण सक्तीचे केले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बहुजनांची एकता  असायला हवी, मात्र मराठवाडा व अन्य काही भागात दलित-सवर्ण असा उल्लेख ऐकुन खंत वाटते. वास्तविक आपण सर्वजन ’बहुजन’ आहोत हे कदापिही विसरता  कामा नये, असेही खा.संभाजी महाराज म्हणाले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी आभार मानले. यावेळी डॉ.दैवत सावंत व डॉ.मनोज  भुनेश्‍वर संपादित ‘दलित्तेतरांचे बाबासाहेब’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.