Breaking News

उ.प्र.मध्ये छेडछाडीला विरोध करणा-या विद्यार्थीनीला जाळले; आरोपी फरार

उत्तर प्रदेश, दि. 28 - उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात छेड काढण्यास विरोध करणा-या विद्यार्थीनीची जाळून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  आरोपी हरिओमविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी रात्री पीडित विद्यार्थिनी घरात काम करत असताना शेजारील तरुण फोन चार्ज करण्यासाठी तिच्या घरी आला. त्यावेळी तिच्या घरातले सर्व गच्चीवर बसले  होते. त्या तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला विरोध केला. ती जोरात ओरडली मात्र जवळ असलेल्या पीठीच्या गिरणीमुळे तिचा आवाज  कोणापर्यंत पोहचू शकला नाही. संकटात अडकण्याच्या भीतीने त्याने तिच्यावर तेल ओतून पेटवून दिले. घरातून धूर येवू लागला त्यावेळी घरच्यांना घटनेबाबत माहिती  मिळाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशिरा तिने शेवटचा श्‍वास घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.