Breaking News

उदारमतवादी विचारधारा व संकुचित विचारांची ही लढाई - मीरा कुमार

मुंबई, दि. 01 - निवडणुका हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. निवडणुका कधीही समाजा-समाजात भेद करत नाहीत. या वेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक म्हणजे  एकीकडे उदारमतवादी विचारधारा आहे, तर दुसरीकडे संकुचित विचार अशी लढाई आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज येथे पत्रकार  परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील प्रचाराचा भाग म्हणून मीरा कुमार यांनी आज महाराष्ट्र व गोव्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेससह इतर मित्र पक्षांच्या  नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या.
निवडणुका समाजा-समाजात भेद करत असत्या, तर लोकशाहीतील महत्त्वाच्या व्यक्तींनी निवडणूक प्रक्रिया पद्धतीची रचनाच केली नसती. राष्ट्रपतीपदाच्या या वेळच्या  निवडणूक काळात उमेदवारांची जात या विषयावर चर्चा का व्हावी. आजवर जेव्हा उच्चवर्णीय उमेदवार होते. त्यावेळी त्यांच्या गुणाची, अनुभवाची चर्चा झाली. मग  आता अशा मुद्यांवर चर्चा का व्हावी. यासाठी सर्वांनीच आपल्या विचारांची उंची वाढविण्याची गरज आहे. बहुभाषिक, बहुधार्मिक देश चालविण्यासाठी जी उदारमतवादी  भूमिका लागते त्याच भूमिकेला स्मरून ही निवडणूक आम्ही लढवत आहोत, असे मीरा कुमार म्हणाल्या.
महाराष्ट्र हे महान राज्य आहे. स्वातंत्र्य आंदोलनाससह देश उभारणीच्या कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. या निवडणुकीत खासदार व आमदार असे जे मतदार  आहेत. त्यांना इतिहास घडविण्याची संधी आहे आणि ती त्यांनी साधावी. निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या आंतरआत्म्याचा आवाज ऐकून त्यानुसार मतदान करावे,  अशी अपेक्षाही मीरा कुमार यांनी व्यक्त केली. या देशातील महिला, दलित, शेतकरी, छोटे व्यावसायिक तसेच सर्व गरिब जनतेने समृद्ध जीवन जगावे, अशी आपली  इच्छा आहे. रोजच्या वृत्तपत्रांत कोणाची तरी हत्या अगदी 16 वर्षाच्या मुलाचीही हत्या झाल्याचे वृत्त आपणास अस्वस्थ करते. याशिवाय नक्षलवादही गंभीर समस्या  आहे. या सर्वांवर केंद्रात बहुमत असलेल्या पक्षाने तोडगा काढावा, अशी मागणी मीरा कुमार यांनी केली.
काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपली निवड राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार पदासाठी केली व 17 पक्षांनी त्याला सहमती दिली याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त  करते. जी मूल्ये आपण आयुष्यभर मानली त्याच मूल्यांवर ही निवडणूक लढवत आहे, असेही त्या म्हणाल्या.  या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांसह मित्रपक्षांचे नेते  उपस्थित होते.