रेल्वेच्या वेळापत्रकात लातूर-मुंबई गाडीचा उल्लेखही नसल्याने परत अंदोलन
लातूर, दि. 27 - बिदरला वळालेली लातूर-मुंबई एक्स्प्रेस पुन्हा जागेवर आणण्यासाठी पालकमंत्री आणि खासदारांनी दिलेली मुदत संपत आली आहे. 15 जूनला रेल्वेचे वार्षिक वेळापत्रक जाहीर झाले. त्यात लातूर-मुंबई गाडीचा उल्लेखही नाही. याचा अर्थ लातूर-मुंबई पुन्हा सुरु होण्याची शक्यता दिसत नसल्याने येत्या एक जुलैपासून पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा निर्धार सर्वपक्षीय रेल्वे संघर्ष समितीचे नेते अशोक गोविंदपूरकर आणि उदय गवारे यांनी दिला आहे. बिदरहून कुर्ल्याला जाणारी रेल्वे जून अखेरपर्यंत बीदर-मुंअई होईल असे खासदारांनी सांगितले होते. तसेच उदगीर आणि बिदरहून तीन नव्या गाड्या सुरु केल्या जातील असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला होता. यातले काहीच झाले नाही. खासदार आणि पालकमंत्र्यांनी शब्द दिल्याने त्यांनी मुदतीपर्यंत थांबणे आवश्यक होते. जसे नवी गाडी सुरु करायला वेळ लागतो तसाच वेळ गाडी बंद करायलाही लागत असेल. याचे भान ठेऊन शांत राहिलो. आता जून महिना संपायला आला आहे. हा शब्द पाळला न गेल्यास 1जुलैपासून पुन्हा आंदोलन सुरु केले जाईल. मात्र ते सांगून केले जाणार नाही असे अशोक गोविंदपूरकर म्हणाले. लातूर-मुंबई बिदरहून सुटत असल्याने आरक्षण करणार्यांना फारसा त्रास होत नाही पण जनरल डब्यात लातुरकरांना पायही ठेवायला जागा मिळत नाही. लातूर-मुंबई एक्स्प्रेस पूर्ववतच चालली पाहिजे हा आग्रह आम्ही सोडणार नाही असे बजावण्यात आले आहे. लातूर-मुंबई ही रेल्वे पूर्ववत सुरु न झाल्यास लोकशाही मार्गानेच आंदोलन करु पण त्याचा उद्रेक होईल असा इशारा उदय गवारे यांनी दिला.