Breaking News

रोहित शर्माच्या ‘या’ खेळीमुळे श्रीलंकेला आजही धडकी भरते!

मुंबई, दि. 08 - सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार्‍या रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी केली आणि  आपण किती तयारीत आलो आहोत, हेच दाखवून दिलं. पाकिस्तानविरोधात आक्रमक फलंदाजी करत हिटमॅनने आपलं कमबॅक धडाक्यात असल्याचं सिद्ध केलं.  चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानाविरोधात रोहित शर्मा भले शतक पूर्ण करु शकला नसेल, मात्र ओव्हलमध्ये श्रीलंकेविरोधात ही कसर भरुन  काढम्यासाठी आणि फोर-सिक्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
खरंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांविरोधात हिटमॅन अधिक आक्रमक होतो, असा पूर्व-इतिहास आहे. कोलकात्यात श्रीलंकेविरोधातच रोहित शर्माने 264 धावांची खेळी केली  होती. ही धडाकेबाज खेळी श्रीलंकन टीम कधीच विसरु शकत नाही. हिटमॅन रोहित शर्मा श्रीलंकन टीमसाठी कायमच धोकादायक ठरला आहे. मॅथ्यूज असो वा  मलिंगा कुणासमोरही रोहित शर्माने संयमी खेळी केली नाही.  रोहित शर्माने आतापर्यंत श्रीलंकेविरोधात एकूण 35 सामने खेळले. यामध्ये 86 च्या स्ट्राईक रेटने 965  धावांची नोंद केली आहे. यात 3 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आगामी सामन्यात रोहित शर्मा हा श्रीलंकेसाठी मोठं  आव्हान ठरणार आहे, एवढं नक्की.