Breaking News

गतवर्षीच्या तुलनेत अकोलेतील धरणांत मुबलक पाणीसाठा

अकोले, दि. 05 - राज्यासह तालुक्यात मान्सूनपुर्व पावसाला सर्वत्र चांगली सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्याची चेरापुंजी तसेच पाणीदार तालुका म्हणून ओळख असलेल्या आदिवासी अकोले तालुक्यातील धरणांमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. जरी वरुणराजाने उशिरा कृपादृष्टी दाखवली असती तरी धरण परिसरांत पाणीटंचाई भासली नसती.
अकोले तालुक्यातील आढळा, प्रवरा, मुळा व आदिवासी भाग या चार विभागांत एकूण 15 छोटी मोठी धरणे आहेत. ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण, प्रवरा नदीवरील निळवंडे धरण, आढळा खोर्‍यातील देवठाण येथील आढळा धरण व मुळा खोर्‍यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण ही चार धरणे तालुक्यातील मोठी धरणे म्हणून ओळखली जातात.तर घोटी शिळवंडी, सांगवी, पाडोशी, आंबित, कोथळे, बलठण, शिरपुंजे, बोरी, बेलापूर बदगी, वाकी, टिटवी ही 11 धरणे छोटी धरणे म्हणून ओळखली जातात. ही सर्व धरणे तालुक्यातील वेगवेगळ्या खोर्‍यांमध्ये विभागलेली असून या धरणांमुळे पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणावर लगाम बसला आहे.
अकोले तालुक्यातील पावसाळी परिस्थिती पाहता पावसाळ्यात प्रचंड धो धो कोसळणारा पाऊस तर उन्हाळ्यात याच परिसरात तीव्र पाणी टंचाईचा प्रत्यय तालुक्यातील नागरिकांना येतो. म्हणजेच पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ अनुभवायचा तर उन्हाळ्यात कडक उन्हाळा व तीव्र पाणीटंचाई अनुभवायची अशी भीषण परिस्थिती आदिवासी नागरिकांना अनेक वर्षांपासून सतावत आली आहे. मात्र गतवर्षी झालेला मुबलक प्रमाणात पाऊस व जलसंपदा विभागाने केलेले पाण्याचे योग्य नियोजन यामुळे यंदा छोटया मोठ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा कमी सोसाव्या लागल्या आहेत.
गतवर्षी सांगवी, शिरपुंजे, बोरी ही धरणे कोरडीठाक पडली होती. मात्र यंदा या धारणांसाहित सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. भंडारदरा, निळवंडे, आढळा, पिंपळगाव खांड, पाडोशी, वाकी, टिटवी, कोथळा या धरणांत सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक असून या धरणाचे पाणी अजून काही दिवस वापरात येणार आहे. सध्या शेतकर्‍यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे केरळात मान्सून दाखल होताच अकोले तालुक्यात देखील पावसाचे वातावरण तयार होऊ लागले असून काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यामुळे बळीराजा अधिकच सुखावला आहे. आता गतवर्षीपेक्षा लवकर मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता निर्माण झाल्याने यंदाही पुरेसा पाऊस कोसळेल असा तर्क जुन्या जाणत्या शेतकर्‍यांनी बांधला आहे.