Breaking News

गुजरात विधानसभा निवडणुकांमधून ’आप’ माघार घेण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. 10 - गुजरातमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीतून आम आदमी पक्ष माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका सभेचे  आयोजन करून गुजरातमधील निवडणुकांसंदर्भातील निर्णय आम आदमी पक्ष जाहीर करणार होता. मात्र, पंजाब-गोवा विधानसभा आणि दिल्ली महापालिका  निवडणुकीत पक्षाला जनतेच्या कसोटीवर उतरण्यास ’झाडू’न अपयश मिळाल्यामुळे आगामी गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याची पक्षाची तयारी नसल्याचे  सांगण्यात येत आहे. गुजरातमधील ’आप’चे नेते व गुजरातचे प्रभारी गोपाल राय यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना 182 जागांच्या संपूर्ण माहितीचा अहवाल सोपवण्यात आला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक लढण्याची घाई करू नये,  या मतांवर गुजरातमधील नेत्यांनी सहमती दर्शवली असून याचा अंतिम निर्णय पक्षाच्या राजकीय समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
निवडणूक लढण्याची घाई करण्यापेक्षा पक्षाने संघटना बांधणीवर भर देणे आवश्यक आहे. काही ठिकाणी संघटना बांधणीचे काम 80 टक्के संघटनेचे काम पूर्ण झाले तर  काही ठिकाणी 20 टक्के काम पूर्ण झाले. सरासरी 50 टक्के संघटना बांधणीचे काम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. आम्ही गुजरातमधील 182 विधानसभा  जागांसंदर्भातील सविस्तर माहिती पक्ष नेतृत्वाकडे सोपवली आहे. त्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची सध्याची स्थिती आणि कार्यकर्त्यांची माहिती देण्यात  आली आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या पक्षांची स्थितीबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसपेक्षा ’आप’ची स्थिती अधिक चांगली असल्याची माहिती पक्ष  नेतृत्वाला दिली आहे, अशी माहिती पक्षाचे गुजरात माध्यम प्रभारी हर्षिल नायक यांनी दिली.